Uncategorized

“दुर्मीळ वनस्पती अन् वन्यजीव असलेलं भीमाशंकर जंगल पुन्हा बघता येणार नाही”; वृक्षतोडीवर अभिनेत्री शर्मिला शिंदेची भावनिक पोस्ट!

मुंबई:

कर्जत परिसरातील ‘टॉरेंट पॉवर’च्या पंप स्टोरेज वीज प्रकल्पासाठी होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते पर्यावरणप्रेमींपर्यंत सर्वच जण यावर तीव्र संताप व्यक्त करत असताना, मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारही पुढे सरसावले आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि विचार करायला लावणारी पोस्ट शेअर करत या वृक्षतोडीवर आपली तीव्र खंत व्यक्त केली आहे.

बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा

शर्मिला शिंदेने तिच्या पोस्टमध्ये बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती म्हणाली की, लहानपणी सकाळी लवकर उठून टेकडीवर जाणे आणि झाडांच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेणे हा खूप आनंददायी अनुभव होता. मात्र, सध्या सुरू असलेला निसर्गाचा ऱ्हास पाहता, भविष्यात पुढच्या पिढीला किंवा आपल्याच पिढीला हा निसर्गाचा आनंद पुन्हा घेता येईल की नाही, याबद्दल शंका वाटते.

 

भीमाशंकर पुन्हा पूर्वीसारखं पाहायला मिळणार नाही

तिने अत्यंत उद्विग्न मनाने लिहिले की, “दुर्मीळ वनस्पती आणि वन्यजीवन असलेलं भीमाशंकर जंगल नक्कीच पुन्हा बघता येणार नाही, याची खात्री आहे.” तसेच लहानपणी भीमाशंकरचे हे सुंदर रूप दाखवल्याबद्दल तिने आपल्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत. या पोस्टच्या शेवटी तिने #BhimashankarForest आणि #MaharashtraForest असे हॅशटॅग वापरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

शर्मिलाच्या या पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून, नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर पुढाकार घेतल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!