Uncategorized

बदलापूरमधील वेदांत नक्षत्र इमारतीत फटाक्याच्या रॉकेटमुळे भीषण आग; पाळीव मांजरीचा मृत्यू, सुदैवाने जीवितहानी टळली

बदलापूर:
बदलापूर पश्चिम येथील चर्चरोड परिसरातील वेदांत नक्षत्र या इमारतीच्या ‘एम’ (M) विंगमधील ११ व्या मजल्यावरील एका फ्लॅटला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमध्ये घरातील सर्व फर्निचर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, एका पाळीव मांजरीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या खाली काही मुले फटाके उडवत होती. यावेळी मुलांनी लावलेले एक रॉकेट थेट ११ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या उघड्या खिडकीतून आत शिरले. हे रॉकेट थेट घरातील देव्हाऱ्यात गेले, जिथे दिवाळीनिमित्त पंती जळत होती. रॉकेट थेट त्या जळत्या पंतीवर पडल्याने क्षणात तिथे मोठा जाळ झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.
काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी तातडीने धावपळ करत सुरक्षित जागा गाठली, ज्यामुळे कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत अडकल्याने एका पाळीव मांजरीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दिवाळीच्या काळात फटाके उडवताना नागरिकांनी आणि मुलांनी काळजी घेणे किती गरजेचे आहे, हेच या अत्यंत दुर्दैवी घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!