संतापजनक! शहीद जवानांचे पार्थिव चक्क डंपरमधून आणले; प्रशासन आणि पोलिसांच्या बेजबाबदारपणावर देशभरातून संतापाची लाट
भाजप आमदार शगुन परिहार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धरले धारेवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

किश्तवाड (जम्मू-काश्मीर):
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा किती मोठा अपमान होऊ शकतो, याचे एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक चित्र जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातून समोर आले आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे (SPO) पार्थिव सन्मानपूर्वक रुग्णवाहिकेतून किंवा तिरंग्यात लपेटलेल्या ताबुतातून आणण्याऐवजी चक्क एका डंपर ट्रकमधून त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणेविरोधात संतापाचा भडका उडाला आहे

किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम दच्छन भागातील कियार गावचे रहिवासी असलेले रशपाल कुमार (वय ४५) आणि बाबी चंद (वय ५७) हे दोन विशेष पोलीस अधिकारी ११ नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर जात असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. जंगलातून त्यांचे गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेले मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर, प्रशासनाने ते त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका किंवा ताबूताचीही व्यवस्था केली नाही. चक्क एका मालवाहू डंपरमधून या शहीद जवानांचे मृतदेह गावात आणले गेले.
डंपरमधून शहीदांचे पार्थिव उतरवतानाचे दृश्य पाहून ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत स्ट्रेचर आणि पांढऱ्या कापडाची व्यवस्था करून पार्थिव खाली उतरवले. यावेळी घटनास्थळी सुरुवातीला कोणताही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.

किश्तवाडच्या भाजप आमदार शगुन परिहार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जाहीरपणे खडे बोल सुनावले. “जर आपलेच अधिकारी आपल्या शहीद जवानांच्या पार्थिवाचा असा अपमान करणार असतील, तर दहशतवाद्यांकडून काय अपेक्षा करणार? देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांची हीच किंमत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे
या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय आणि सामाजिक स्तरावर उमटत आहेत. विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले असून, शहीदांच्या अपमानास कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाढत्या जनक्षोभानंतर प्रशासनाने अखेर दोन्ही शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले




