बाहेरचे’ नेमके कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या नावाला विरोध करून मनसेने कोणता इतिहास जपला?

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२६:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चैत्यभूमी‘ करण्याची प्रक्रिया आगामी हिवाळी अधिवेशनात पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांच्या दशकांच्या प्रदीर्घ मागणीला न्याय मिळत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी या नामकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. किल्लेदार यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी‘ नाव देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेताना यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे की, “दादरचं नाव बदलताना दादरकरांचं मत विचारात घेतलं गेलं नाही. बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवत दादरकरांची ओळख पुसण्याचं काम सुरू आहे.”
किल्लेदार यांच्या ‘बाहेरचे लोक’ आणि ‘ओळख पुसणे’ या शब्दांवर आंबेडकरी संघटना आणि विचारवंतांकडून कडाडून टीका होत आहे. आंबेडकरी जनतेने या विरोधाचा समाचार घेताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:
• बाबासाहेब आणि दादरचे अतूट नाते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः दादरमधील ‘राजगृह’ येथे वास्तव्यास होते. ज्या दादरच्या भूमीत महामानवाने वास्तव्य केले आणि जिथे त्यांची पवित्र ‘चैत्यभूमी‘ आहे, त्याच भूमीत बाबासाहेबांच्या अनुयायांना ‘बाहेरचे’ म्हणणे हा संपूर्ण देशाचा आणि संविधानाचा अवमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘चैत्यभूमी‘ हे केवळ नाव नसून ते समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे जागतिक ऊर्जाकेंद्र आहे. दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव दिल्याने दादरची ओळख पुसली जाणार नसून, या ऐतिहासिक वास्तूची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर अधिक उंचावणार आहे, असे मत आंबेडकरी अभ्यासकांनी मांडले आहे.
येत्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून १५ लाखांहून अधिक अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणार आहेत. अशा संवेदनशील वेळी सरकारने नामकरणाचा सकारात्मक निर्णय घेतलेला असताना, मनसेने घेतलेली ही भूमिका आंबेडकरी समाजामध्ये दुरावा निर्माण करणारी असल्याची टीका होत आहे,
एकीकडे राज्य सरकारने केंद्राच्या मार्गदर्शनानुसार हिवाळी अधिवेशनात नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे मनसेने याविरोधात पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा इशारा दिला आहे. मनसेच्या या भूमिकेविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून, महामानवाच्या स्मारकाच्या नावाला विरोध करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असा इशारा चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला आहे.




