तुकाराम मुंढे यांच्या घरावर दरोडा? बातमीने उडाली संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ;
तुकाराम मुंढे’ नावामुळे यंत्रणाही चक्रावल्या! मध्यरात्री बंगल्यावर दरोडा अन् प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी केला मोठा खुलासा

ठळक बातमी:
ठाणे, दि. २० नोव्हेंबर:
डॅशिंग आयएएस अधिकारी आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या घरावर दरोडा पडल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. खुद्द प्रशासनालाही या वृत्ताने घाम फुटला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणाचे वेगळेच आणि धक्कादायक सत्य समोर आले असून, नावातील साधर्म्यामुळे हा मोठा गैरसमज उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दरोडा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरी नव्हे, तर ठाण्यातील दिवा येथील स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या बंगल्यावर पडला आहे.
ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील आगासन गाव परिसरात उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा बंगला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ८ ते १० सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने या बंगल्यात प्रवेश केला. घरात झोपलेल्या नोकराला चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ८० ते ८४ हजार रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
या घटनेनंतर उद्योजक तुकाराम मुंडे यांनी केलेला दावा अत्यंत खळबळजनक आहे. “दरोडेखोर केवळ चोरीसाठी नव्हे, तर माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले होते,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घटनेच्या वेळी मुंडे यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. दरोडेखोर दरवाजा तोडत असताना मुंडे यांनी प्रसंगावधान राखत गावातील नागरिकांना फोन केला. ग्रामस्थ धावून आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. नोकराला धमकावतानाचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तक्रारदाराचे नाव ‘तुकाराम मुंडे’ असल्याचे समजताच आयएएसे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याच घरी दरोडा पडल्याची चर्चा सुरू झाली आणि पोलीस यंत्रणाही गडबडली. अखेर पोलिसांनी अधिकृत खुलासा करत ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिव्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.




