ताज्या घडामोडी

उल्हासनगर मधिल शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात बीएससी नर्सिग सुरू करा_आमदार बालाजी किणीकर !

आरोग्य मंत्री ना.डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लेखी मागणी !

उल्हासनगर व परिसरातील एकमेव शासकीय रुग्णालय असलेल्या उल्हासनगर -३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे २०२ खाटांचे ३५० खाटामध्ये श्रेणीवर्धन करण्यात यावे. त्याचबरोबर या रुग्णालयात विनावापर असलेली जमीन मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी नर्सिंग कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकरिता बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात यावे. अशी लेखी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री ना.डॉ.तानाजी सावंत साहेब यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य विभागाच्या व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी दिल्या आहेत. याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे देखील याबाबत आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मागणी केली होती.
उल्हासनगर शहर हे फाळणीतील ठाणे जिल्ह्यात मध्यवर्ती भागात वसलेले शहर आहे. लष्करी छावणीच्या वेळी जवानांना आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने उल्हासनगर येथे दवाखाना सुरू करण्यात आला होता. तद्नंतर काळानुरूप या रुग्णालयात दि.१० मे १९८३ पासून २०२ खाटाचे मध्यवर्ती रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले व या रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. परंतु, सद्य:स्थितीत उल्हासनगर शहराची लोकसंख्या अंदाजे ९ लाखाहून अधिक झाली असून हे शहर ५ कॅम्पमध्ये विस्तृतपणे व्यापले आहे. या रुग्णालयात उल्हासनगर व कल्याण महापालिका क्षेत्रातील तसेच अंबरनाथ, बदलापूर, या नागरी भागातील रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत असतात. तसेच जवळच मध्यरेल्वेचा लोहमार्ग असल्याने अपघाती रुग्णांच्या देखील संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे २०२ खाटावरून ३५० खाटामध्ये श्रेणीवर्धन करून त्यामध्ये खाटाच्या संख्यामध्ये वाढ करणे ही काळाची गरज बनली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या आधी ही राज्याचे आरोग्य मंत्री तसेच आरोग्य विभागाच्या सचिवांकडे याबाबत बैठक घेत मागणी केली आहे. यामागणी सोबतच उल्हासनगर शहराबरोबरच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, वांगणी या भागातील नर्सिंग कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत आहे. सद्या सुमारे बारा एकर हून अधिक जमीन या रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. या रुग्णालयातील विनावापर असलेल्या मोकळ्या जागेत नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आल्यास त्याचा या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो याकरिता येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात यावे अशी मागणी केली असून आता त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह आरोग्य मंत्री ना.डॉ.सावंत यांचे बळ मिळाल्याने हे काम मार्गी लागणार असून उल्हासनगर वासीयांना दर्जेदार आरोग्य सुविधे बरोबरच नर्सिंग प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही दिलासा मिळणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.