महाभारताच्या काळापासून परिचित असलेले सातारा जिल्ह्यातील “आपले कराड”._
मीनाताई घळसासी _वैदही शाखा कराड

कराड हे सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे गाव आहे. सर्वाधिक प्राचीन अवशेष कराडमध्ये आहेत असे म्हटले जाते. महाभारताच्या सभापर्वामध्ये करोहाटक असा या गावाचा उल्लेख आढळतो. सध्या कराड हेच नाव प्रचलित आहे.
कराड हे कृष्णा कोयनेच्या काठावर वसले गाव ;
कराडच्या नैऋत्य दिशेला आगा शिवाचा डोंगर , वायव्य दिशेला वसंतगड आणि आग्नेय दिशेला मच्छिंद्रगड आहेत
.
कराडला कृष्णा कोयना व वांग या नद्यांनी समृद्ध केले आहे.
वायव्येकडून येणारी कृष्णा कराड जवळ येतात दक्षिणवाहिनी होते तर पश्चिमेकडून येणारी कोयना कराड जवळ आल्यावर उत्तराभिमुख होऊन कृष्णा नदीस सरळ रेषेत मिळते. कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा कराड येथेच 180 अंशात संगम होतो हे जगातील एकमेव उदाहरण असावे. हा संगम प्रीती संगम म्हणून ओळखला जातो या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात.
1731 च्या सुमारास कराड प्रांताचा कारभार श्रीपतराव प्रतिनिधी यांच्याकडे होता. कराड मधील भुईकोट किल्ला ही त्यांची राजधानी होती. तेथे असणारे भवानी मंदिर आजही कराड वासियांचे श्रद्धास्थान आहे. तिथून जवळच असणारी दगडी विहीर नकट्या रावळ्याची विहीर म्हणून ओळखली जाते ही विहीर नकटा राऊळ नावाच्या भूताने एका रात्रीत बांधली असे म्हणतात.
संगमेश्वर हे प्रीती संगमा जवळचे मंदिर सर्वात पुरातन मंदिर मानले जाते. तेथे जवळच यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे . हटकेश्वर हे कराडचे ग्रामदैवत ; तर भैरोबा चे ही पुरातन मंदिर येथे असून याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. कमलेश्वर मंदिर हे स्वयंभू देवस्थान आहे. त्याचप्रमाणे गोंदवलेकर राम मंदिर, वडचा गणपती , काळा मारुती, वीर मारुती , कमानी मारुती ही मंदिरे वैशिष्ट पूर्ण आहेत. कृष्णाबाई , उत्तरा लक्ष्मी , दैत्य निवारणी इत्यादी मंदिरे उल्लेखनीय आहेत.
आदिलशहा यांनी बांधलेले पेठेतील दोन मनोरे 106 फूट उंचीचे आहेत या मनोऱ्यामध्ये पूर्वीच्या काळी कैदी ठेवले जात.
1855 मध्ये कराड शहर इंग्रजांच्या ताब्यात होते तेव्हा नगर परिषदेची स्थापना झाली.
कराड मधील शिक्षण क्षेत्राचा आढावा घेताना येथे विद्वानांची मोठी परंपरा आढळते. 1908 च्या पूर्वीपासून सोमवार पेठेतील भैरोबाच्या मंदिराच्या माडीवर एक वेदपाठशाळा होती. तेथे संस्कृत भाषा आणि व्याकरणाचे शिक्षण दिले जात असे. महाराष्ट्र हायस्कूल मध्ये राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समिती वर्धा या संस्थेच्या परीक्षेचे वर्ग चालत
1954 मध्ये कराडला माध्यमिक शालांत परीक्षेचे केंद्र सुरू झाले. 1958 मध्ये शास्त्र शाखेचे शिक्षण देणारे सायन्स कॉलेज सुरू झाले.
आज अखेर कराडमध्ये अनेक उत्तम शाळा व महाविद्यालये आहेत तेथे शिकलेले विद्यार्थी विविध कार्यक्षेत्रात नाव मिळवत आहेत.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कराडला शब्दसृष्टीच्या ईश्वराने अनेक लेखक कवीने संपन्न केले आहे.
प्राचीन निबंध, कथा, कविता ,नाटक चरित्र ,आत्मचरित्र, ललित लेखन करणाऱ्या अनेक नामवंत साहित्यकार यांनी कराडचे वांग्मयीन विश्व समृद्ध केले आहे.
क्रीडा क्षेत्रात सुद्धा कराड मागे नाही अनेक नामवंत खेळाडूंनी विविध क्षेत्रात जागतिक प्राविण्य मिळवले आहे.
कराड सारखी गावे मोठी होतात ती त्या गावातील माणसांमुळे त्यांच्या कर्तुत्वामुळे संत सखुची भावभक्ती त्याचप्रमाणे विधायक कार्यासाठी हातभार लावणारे पांडू अण्णा शिराळकर ,लाहोटी, त्याग पूर्ण देशसेवा व अखंड ज्ञानसाधना करणारे गणेश आळतेकर गोखले स्वातंत्र्योत्तर काळात नवं महाराष्ट्राला आकार देणारे यशवंतराव चव्हाण अशा अनेक कर्तुत्ववान व्यक्तींमुळे कराडचे नाव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात भारताबाहेरही प्रसिद्ध पावले आहे