महाराष्ट्र

आव्हानांचा समर्थपणे “सामना” करून विरोधकांचे “प्रहार” परतवून लावणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे*

दिलीप मालवणकर उल्हासनगर 9822902470

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात धाकटे चिरंजीव आज 61 वर्षाचे झाले. ठाकरे घराण्याचा लौकिक व शिवसेनेची दैदिप्यमान कारकिर्द ज्यांच्याकडे वंशपरंपरेने आली, ते उद्धव ठाकरे , महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री 62 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! या निमित्ताने त्यांच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला आढावा.

कै. बाळासाहेब ठाकरे यांना एकुण तीन सुपुत्र. त्यापैकी बिंदुमाधव यांचे १९९६ साली अपघाती निधन झाले.दुसरे सुपुत्र जयदेव ठाकरे यांचे व बाळासाहेब यांचे कधीच पटले नाही. १९९० पासून त्यांच्यात कटुता निर्माण झाली ती अखेरपर्यंत टिकली.बाळासाहेब त्यांच्याबद्दल अतिशय उद्वेगाने बोलत.तिसरे सुपुत्र म्हणजे आपले पक्ष प्रमुख मा.उद्धव ठाकरे. बाळासाहेबांनी आपल्या अखेरच्या दिवसात
शिवसैनिक व महाराष्ट्राला भावनिक आवाहन केले होते, माझ्यावर प्रेम केले तसेच उद्धव व आदित्यवर करा.
बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानणा-या शिवसैनिकांनी हे भावनिक आवाहन शिरसावंद्य मानले व उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आनंदाने स्विकारले.

उद्धव ठाकरे यांना सुरवातीस राजकारणात अजिबात रस नव्हता.ते बालमोहनचे विद्यार्थी होते.
त्यावेळेपापासून त्यांना क्रिकेटचे वेड होते.फलंदाजी त्यांना आवडत असे. एकदा ते राज ठाकरे यांच्या सोबत बॅडमिंटन खेळत होते.खेळता खेळता ते पडले.ते पाहून सर्वजण हसू लागले.त्या दिवसापासून ते पुन्हा बॅडमिंटन खेळायला तिथे गेले नाहीत. परंतू त्यांनी बॅडमिंटनचे रितसर प्रशिक्षण घेतले सराव केला व त्यात ते तरबेज झाले. इतके की त्यांना त्यावेळी हसणा- यांना देखील पराभूत करू शकत होते.हीच त्यांची वृत्ती राजकारणात देखील दिसून येते.बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांचे नांव २००३ साली महाबळेश्वर येथे कार्याध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांच्या तोंडून जाहिर करायला लावले तेंव्हा जे लोक उद्धव ठाकरे यांना हसत होते, तेच आज उद्धव ठाकरे यांचे गुण गात आहेत. २००२ साली राजकारणात सक्रिय झाले, त्यावेळी जाहिर सभा व भाषण टाळणारे उद्धव ठाकरे गेली 18 वर्षे जाहिर सभेत भाषणं करून लोकांना प्रभावित करीत आहेत. जाहिर सभेची व भाषणाची भीती घालवण्यासाठी त्यांना बाळासाहेबांनी एक मंत्र दिला होता.मोठमोठ्या गोष्टी बोलू नका, लोकांच्या मनातील बोलावे.हा मंत्र त्यांनी आत्मसात केला त्यामुळे आज उद्धव ठाकरे लाखोच्या सभा व विधान सभा देखील गाजवत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी जे.जे.स्कूल मधे प्रवेश घेतला परंतू त्यांना फोटोग्राफीची खुप आवड होती.आजच्या भाषेत ते त्यांचे पॅशन होते. ते जर राजकारणात आले नसते तर एक जागतिक कीर्तिचे फोटोग्राफर झाले असते.त्यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची केलेली हवाई फोटोग्राफी याची ग्वाही देत आहे. या फोटोग्राफीचा उपयोग त्यांना राजकारणात देखील होत आहे. नेमकी लेन्स वापरणे, योग्य तो फोकस देणे व योग्य वेळ साधून क्लिक करणे याचा वापर ते राजकारणात करीत असल्याने त्यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली.

मी आणि माझी पत्रकारीता स्तुतिपाठक कधीही नव्हती व यापुढेही नसेल.परंतू गुणग्राहकता व योग्य व्यक्तीचा सन्मान करणे मी व माझी पत्रकारीता जाणते. उद्धव ठाकरे यांची राजकीय वाटचाल मी जवळून पाहिली आहे.एक संयमी,सौम्य व्यक्तीमत्व.बाळासाहेबांची आक्रमक शैली त्यांच्याकडे नाही, सडेतोडपणा देखील नाही पण बाळासाहेबांचे राजकीय व नेतृत्वगुण रक्तात भिनलेले,
जन्मजात बाळकडू मिळालेले. मात्र ठाकरे घराण्याची एखादी सदस्य सक्रिय राजकारणात जाईल, अशी कल्पना देखील कोणी केली नसेल.त्यामुळे कोणी तरी ठाकरे मुख्यमंत्री होतील ! असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते.
भाजपाच्या आडमुठेपणामुळे युतीचा काडीमोड झाला आणि सर्वसंमतीने उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली.अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधान भवन सोडा पंचायत समिती,नगरपालिका, महापालिका प्रशासनाचा किंचित अनुभव नसलेले उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री होतात,ते राज्यकारभार कसा हाकणार ? झिरो अनुभव असलेला मुख्यमंत्री अशी संभावना विरोधक करू लागले. हे सरकार टिकणार नाही. मी पुन्हा येईन,पुन्हा येईन,अशी स्वप्नं माजी मुख्यमंत्री रंगवू लागले. तोडफोड,
फंदफितुरी घडवून सरका बांधला होता व एका गाफिल क्षणी त्यांनी आपल्या पक्ष प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून आपला डाव साधला.सूर्याजी पिसाळांनी अखेर घात करून त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले,तेंव्हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेचा कंड क्षमला.

कोणताही आक्रस्ताळेपणा नाही, राहणीमानात बदल नाही,शांत,
संयमीपणा ढळू दिला नाही. कुठलाही बडेजाव नाही. सर्वसामान्य जनतेत सहज मिसळणे,त्यांच्या दुःखावर फुंकर मारणे, सांत्वन करून जातीने लक्ष घालणे,हे पारंपरिक माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा काही तर हटके वागणे,लोकांना भावले.एक दिवसाचाही म्हणजे शून्य अनुभव असलेला मुख्यमंत्री बघता बघता लोकांच्या गळ्यातील ताईत झाला.आक्रमक, आक्रस्ताळी व मुख्यमंत्रीपद हातचे गमवावे लागलेल्या माजी मुख्यमंत्री कम विरोधी पक्ष नेत्याच्या तोफखान्यास निर्विकारपणे व खंबीरपणे तोंड देत होता, त्यांच्या विरोधाचे हल्ले निष्क्रिय व निष्फळ ठरवत होता.हे सारे त्यांना अनाकलनीय व अनपेक्षित होते.

राज्यापुढील अस्थिरतेचे मळभ दूर होऊन स्थीर सरकार अस्तित्वात आले. आता ते सर्व अडचणींची समर्थपणे सामना करीत व विरोधकांचे प्रहार उलटवून लावत महाराष्ट्र राज्याची धुरा खंबीरपणे आपल्या खांद्यावर पेलत होते. कोरोनारूपी न भूतो न भविष्यती असे संकट त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीच्या प्रारंभीच आले होते. त्यांनी या संकटांवर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची व विशेषतः धारावी पॅटर्न ची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली होती,यातच सर्व आले. मुख्यमंत्री
पदावर विराजमान होऊन जेमतेम चार महिने होतात न होतात तर एक सुलतानी संकट कोरोनाच्या रूपाने देशाप्रमाणेच महाराष्ट्रावर देखील आले.देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कधीही न आलेले हे संकट होते.या अतिशय दुर्मिळ व कठोर परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवित रक्षणासाठी उद्धव ठाकरे यांनी गेले दीड दोन वर्ष जी जीवतोड मेहनत केली,
लोकांना दिलासा दिला,स्वतः युद्धभूमीवर उतरलेल्या योद्ध्याप्रमाणे त्यांनी अहोरात्र पाहणी केली,त्यावर तात्काळ उपाय योजना केल्या, त्या काबिले तारीफच होत्या.स्वतःची अॅन्जियोप्लास्टी झालेली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते अहोरात्र झटत होते.प्रतिबंधात्मक उपाययोजने सोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांना यश आले.महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार/लागण रोखण्याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देणारे डाॅक्टर,मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफ,शासकीय कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाच जाते. त्यापाठोपाठ गेल्या पावसाळ्यात जलदेवतेने उग्र रूप धारण केले होते.गावंच्या गावं वाहून गेली होती.अमाप वित्त हानी झाली होती.
जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. या संकटाचा देखील ते खंबीरपणे मुकाबला करून लोकांना दिलासा देत होते.पुनर्वसनाच्या योजना आखत होते. कोरोना काळात तर त्यांनी साधलेला आँनलाईन सुसंवाद व जनतेची कुटुंबप्रमुखाप्रमाणे केलेली आस्थेवाइक काळजी यामुळे त्यांनी जनतेच्या ह्रदयात स्थान प्राप्त केले.त्यामुळेच आज शिवसेनेला न मानणारा तळागाळातील मोठा वर्ग देखील उद्धवजींना ज्यापद्धतीने धोका दिला त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत व सहानुभूती दर्शवत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात धडाकेबाज निर्णयांनी केली.त्यामुळे खिंडीत गाठू पाहणा-या विरोधकांना धडकी भरली होती. अशा पद्धतीने धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता फक्त बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्यात होती.किंबहूना त्याहीपेक्षा अधिक तडफेने व वेगाने उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली होती.त्यामुळे विरोधकांनी पुन्हा सत्ता काबीज करण्याची स्वप्नं पाहणे सोडून दिले होते.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वास आघाडीतील राष्ट्रवादी व काॅन्ग्रेसने देखील संमती दर्शवली होती.यातच त्यांच्या कुशल नेतृत्वाची कसोटी पार पडली होती. निर्विवाद बहुमत असलेले,समविचारी पक्षाला सोबत घेऊन युतीचे सरकार चालवणे कठीण नसते.येथे तर परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या व यापूर्वी साप- मुंगुसाप्रमाणे वैरी असलेल्या पक्षांना सोबत घेऊन सरकार यशस्वीपणे चालवणे खुपच कठीण होते. बेरके विरोधक हिंदुत्व व सावरकर या विषयांवर उद्धव ठाकरे व शिवसेनेपुढे पेच प्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते.त्यावर मात करून सोबत असलेल्या दोन पक्षांना विश्वासात घेऊन राज्य शकट हाकणे, ये-या गबाळ्याचे काम नव्हते. या आधीच्या सरकारचे अनेक निर्णय बदलण्याचे धाडसी निर्णय त्यांनी घेतला.त्यात आरे मधील लोकोशेड हलविण्याचा निर्णय महत्वाचा होता. अशा प्रकारे सर्व कसोटींवर सत्व परीक्षांना तोंड देत त्यांनी महाराष्ट्राचे एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून नांवलौकिक संपादन केला होता.

अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तावून सलाखून निघाले,जशी सोन्याची पारख त्याला तापवून केली जाते तसे उद्धव ठाकरे यांना या न भूतो न भविष्यती प्रसंगाने सिद्ध केले.डिझास्टर मॅनेजमेंटचा अजिबात अनुभव नसताना विपरीत परिस्थितीवर मात करणे लहान सहान बाब नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून इतके यशस्वी होतील, असे कोणा भविष्यवेत्त्याने सांगितले असते तर विरोधकांनी त्याला वेड्यातच काढले असते. संघटना वा पक्ष पातळीवर पक्ष प्रमुख वा नेता म्हणून निर्णय घेणे सोपे असते.कारण तो त्यांचा सर्वाधिकार असतो.त्याला कोणी आव्हान देऊ शकत नाही. किंबहूना तो निर्णय घेण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते.बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर गेली अकरा वर्षे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. परंतू पक्षाचे नेतृत्व व परस्पर विरोधी विचारसरणीच्या इतर पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याचे नेतृत्व निर्विवादपणे करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

मध्यंतरी त्यांच्यावर मणक्याच्या दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या. त्या दरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे व अन्य सहका-यांवर विश्वास टाकून शिवसेनेची जबाबदारी सोपवली होती.मात्र याच परिस्थितीचे रूपांतर शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी संधीत केले व आमदार खासदारांची मतं व मनं कलुषित करून आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळवले.विधान सभा व विधान परिषदेच्या निवडणूका दरम्यान कटाला अंतिम स्वरूप देऊन आमदारांना फितवून सुरत,गुवाहत्ती व गोव्याला नेऊन भाजपाच्या दावणीला बांधले व भाजपा श्रेष्ठींच्या इशा-यावर आपल्याच पक्षाच्या पक्षप्रमुखाचा घात करून त्यांना पायउतार होण्याची नामुष्की आणली. नंतरचे राजकारण सर्वांना ठाऊक आहे.

या न भूतो न भुतो परिस्थितीस उद्धव ठाकरे हे ज्या धीरोदात्तपणे तोंड देत आहेत, पक्ष विरोधकांना यशस्वीपणे शह देत आहेत, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली असून त्याउलट गद्दार व अस्तनितल्या निखा-यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना व धनुष्यबाण हायजँक करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्राची जनता आतूर झाली आहे.

गद्दारांना सर्वोच्च न्यायालयातून दणका बसून शिवसेनेस न्याय मिळावा, अशी अपेक्षा व मनापासून शुभेच्छा सर्वच शिवसैनिक व महाराष्ट्राची जनता त्यांच्या वाढ दिवसानिमित्त देत आहे. सच्चे का बोलबाला व झुठे का मुंह काला, झालेच पाहिजे, याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.