विमानतळ प्राधिकरण माजी संचालक कमलेश कटारिया यांचा सन्मान

डॉ सुरेश राठोड
कोल्हापूर प्रतिनिधी:
कोल्हापूर येथील छत्रपती राजाराम महाराज विमानतळाचे विस्तारिकरण व सुशोभीकरण करण्यात मोलाचा वाटा असणारे तसेच ग्राहकांना विनम्र सेवा देण्यासाठी सतत कार्यरत असणारे माजी संचालक कमलेशजी कटारिया यांचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बि.जे.पाटील यांच्या हस्ते श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.तसेच महानगर अध्यक्ष अशोक शांताराम पोतनीस यांचे हस्ते , मा. कमलेशजी कटारिया यांना ” मानपत्र” देऊन व नुतन संचालक अनिलजी शिंदे यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात, ग्राहक पंचायतचे दैवत स्वामी विवेकानंद व ग्राहकतिर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सदस्या सौ.आरती पोतनीस यांनी ग्राहक गीत सादर केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर महानगर अध्यक्ष यांनी नविन ग्राहक संरक्षण कायदा २०१९,हा ग्राहकांच्या हिताचा असुन ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी कडक कारवाई, कारावास व दंड यांची तरतूद करण्यात आली आहे याची माहिती दिली व ग्राहकांनी त्यांच्या हक्काबरोबर त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून, जबाबदार ग्राहक म्हणून व्यवहार केला पाहिजे असे प्रतिपादन केले. ज्या प्रमाणे ग्राहक अयोग्य वस्तू व सेवा यांच्या करिता तक्रारी करतो, त्याचप्रमाणे चांगली व समाधानकारक सेवा व चांगला व्यवहार करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणे हेही महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा संघटक सुरेश माने यांनी प्रास्ताविक करताना संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. तसेच आत्तापर्यंत नि:शुल्क सेवा देऊन ग्राहकांच्या आलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण केलेल्या कामाचा आढावा घेतला.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बि.जे.पाटील यांनी ग्राहकांच्या विमान सेवेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कटारिया साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण झालेचा अनुभव सांगितला व नुतन संचालक अनिलजी शिंदे यांच्या कडून या पुढे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य मिळेल अशा विश्वास व्यक्त केला. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यापुढे संस्थेच्या माध्यमातून विमानतळ प्राधिकरण संचालक यांच्या बरोबर संवाद व समन्वय साधू असे प्रतिपादन केले.
नुतन संचालक मा. अनिलजी शिंदे यांनी कटारिया साहेबांनी केलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले व कटारिया साहेबांच्या कडून जी मोठी जबाबदारी माझ्याकडे आली आहे त्याला
चांगल्या रितीने योग्य तोच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिन असा विश्वास व्यक्त केला. तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष लक्ष देऊ अशी ग्वाही दिली.
विमानतळ सुरक्षा अधिकारी मा.विलास भोसले यांनी विमानतळ सुरक्षा बद्दल माहिती दिली व कटारिया साहेबांचा सर्वांच्या प्रती असलेला स्नेह व सहकार्याची भावना यामुळे एक ऋणानुबंध जोडणारे नाते निर्माण झाले आहे व या पुढेही असेच कायम राहील असे सांगून कटारिया साहेबांचे अभिनंदन करुन त्यांना सुभेच्छा दिल्या.
संजय पोवार प्रवासी महासंघाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कमलेश कटारिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, कोल्हापूर जनतेने दिलेले प्रेम, जिव्हाळा, आदर व सहकार्य यामुळेच आपण देशातील सर्वोत्तम विमानतळाचे विस्तारिकरण करू शकलो , तसेच छत्रपती राजाराम महाराज यांनी दुरदृष्टीने विचार करून विमानतळाची जागा निवडली ती अतिशय योग्य असून यापुढे कोल्हापूर विमानतळावर लवकरच
“विमान एअर बस ” दाखल होणार आहे व भारताच्या अनेक भागात जाण्यासाठी कोल्हापूर हे अग्रेसर विमानतळ होईल असे मत व्यक्त केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कोल्हापूर महानगर यांचे कामाबद्दल कौतुक करून,उपस्थित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.तसेच यापुढे ही आपल्याशी संपर्कात राहून सहकार्य करू अशी ग्वाही दिली.कोल्हापुरचे पोषक वातावरण, कोल्हापूरची जनता, सुरक्षाव्यवस्था कर्मचारी, अधिकारी, महिला पोलिस अधिकारी भगिनी, यांनी विमानतळ विस्तारीकरण करण्यात दिलेलं योगदान व सहकार्य कायमस्वरूपी माझ्या हृदयात राहिल असे भावनाविवश होवून सांगितले.
संस्थेच्या सदस्या सौ प्रज्ञा यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, कार्यक्रमाचे आयोजन सचिन गणबावले यांनी केले, सुत्रसंचलन महानगर अध्यक्ष अशोक शां.पोतनीस यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या वेळी पुणे विभागीय सदस्य सुशांत पाटील, करवीर अध्यक्ष उमेश कुंभार, सचिव सचिन गणबावले, सौ. आरती पोतनीस, सौ.प्रज्ञा यादव, जिल्हा संघटक सुरेश माने, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष संजय पोवार, सदस्य शिवगोंडा पाटील दत्तवाड, वैद्य सचिन किरण बेलेकर, बजरंग कांबळे, दिपक पेटकर तळवणी, लालचंद पारीक इचलकरंजी, सुरक्षा कर्मचारी, अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.