आरोग्य व शिक्षण

कोकण शिक्षक मतदार संघात कोण जिंकणार ? सौदेबाज उमेदवाराचीच सरसी होईल !

'ज्याच्या गळाला मोते समर्थक,,तोच विजयाचा धनी"

(जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर याज कडून,,,
उद्या ३० जानेवारी रोजी संपन्न होणा-या कोंकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नेमके कोणाचे पारडे जड आहे, हे कोणत्याही राजकिय समिक्षकाला ठामपणे सांगता येणार नाही. कारण जेव्हा मतदान हे तत्वावर, निष्ठेवर आधारित असते तेंव्हा त्याचा अंदाज वर्तविणे शक्य असते. आजवर मी अनेक निवडणुकांची समिक्षा केली होती व ती सत्यात उतरली होती. कारण त्या निवडणुका मूल्याधारित होत्या. आताच्या निवडणुका या मूल्यावर आधारित आहेत. मतदाराचे मुल्य ठरवणे व ते विकत घेता येणे ज्याला शक्य होईल तोच जिंकेल,अशी सरळसोट व्यावसायिकता वा सौदेबाजी ज्याला जमेल; तोच सिकंदर ठरेल ! हे आता उघड गुपित आहे.

काल माझे मित्र शांताराम निकम जे स्वत: शिक्षक आहेत,त्यांनी शिक्षक देखील पैसे घेऊन मतदान करतात याबद्धल खंत व्यक्त केली. पन्नास साठ हजार वेतन घेणारे जे शिक्षक जर पाच हजारात विकले जात असतील तर ते देशाच्या लोकशाहीला कलंक आहेत. संविधानाचे गोडवे गाण्याचे व बाबासाहेबांचे नांव उच्चारण्याचा नैतिक अधिकार त्यांना पोहचतो का ? याचे अशा विकाऊ शिक्षक मतदारांनी आत्मचिंतन करावे. अजूनही बरेच शिक्षक मतदार निष्ठेने व तत्वाने मतदान करतात.परंतू निवडणुकीत निर्णायक ठरतात ती अशी विकाऊ मतं व मतदार ! त्यामुळे एक एक मत मौल्यवान असते. जे शिक्षक पैसे घेऊन मतदान करतील ते आपले इमान गहाण ठेवतील, त्यांना विद्यार्थांना ज्ञानाचे डोस पाजण्याचा अजिबात अधिकार नसेल.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांगुन गेले “लढला नाहीत तरी चालेल पण विकले जाऊ नका” याच धर्तीवर एकवेळ मतदान केले नाही तरी चालेल पण मत विकू नका !असे सांगावेसे वाटते. पाच हजार अथवा शाळेला काॅम्प्युटर वा प्रिंटर दिल्यानंतर मतं विकणारे संस्थाचालक वा शिक्षक हे लोकशाहीचे मारेकरी आहेत.
चांगली माणसं लोकप्रतिनिधी म्हणुन निवडून येत नाहीत ! अशी बोंब पांढरपेशे मतदार उच्चारवाने मारत असतात पण तेच एक तर मतदाना बाबत उदासिन राहून सुट्टी एन्जाॅय करतात किंवा इमारतींच्या रंगरंगोटी वा इतर गरजांची पूर्तता करून घेऊन मतं विकतात.अशा सौदेबाज मतदारांमुळे फक्त धनाढ्य व व्यापारी वृत्तीचे सौदेबाज निवडणुका
जिंकतात. खरे सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी होऊ शकत नाहीत.
याचा खुप वाईट अनुभव मी स्वत: घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर बाळाराम पाटील व ज्ञानेश्वर म्हात्रे यापैकी कोण विजयी होईल तर याचे उत्तर जो पांढरपेशे व प्रतिष्ठीत असे शिक्षक मतदार जास्तीत जास्त विकत घेईल; तोच विजयी होईल.शिक्षक मतदार संघाची निवडणुक – संतसर, बापट सर, भालेराव सर,मोतेसर यांच्या सर्व निवडणुका मी पाहिल्या आहेत.या काळात मतदार विकले जात नव्हते तर मेरीटवर मतदान होत होते.२०१७ साली बाळाराम पाटील निवडून आले ते धनशक्तिच्या बळावर ! इथुनच शिक्षक मतदार संघाला सौदेबाजीची कीड लागली. आत्ता ती गणिती श्रेणीने वाढत आहे. मोते सर दोन वेळा निवडून आले ते त्यांच्या कार्यामुळे व लोकप्रियतेमुळे. सरांना मागच्या वेळी भाजपाने धोका दिला व पराभूत झाल्याने वैफल्यग्रस्ततेमुळे त्यांचा बळी गेला. त्यामुळे मोते सरांना गेल्या वेळी मिळालेली ५९८८ मतं कोणाच्या पारड्यात पडतात यावर जय पराजय ठरणार आहे. गेल्या वेळी बाळाराम पाटील यांना ३७६४४ मधुन ११८३७ मतं मिळाली होती तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ६८८७ मतं मिळाली होती तर बेलसरे यांना ४५३३ मतं मिळाली होती. म्हणजे बाळाराम पाटील यांचे मताधिक्य ४९५० इतकं होतं. यावेळी वाढलेले मतदार २०२३ आहेत.ती मतं कोण खेचतो व किती खेचतो हे ही महत्वाचे ठरणार आहे.मोते सरांना मिळालेली मतं कोणाच्या पारड्यात पडतात हे पाहणे महत्वाचे ठरेल व ती मतंच निर्णयक ठरू शकतात. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणुन बाळाराम पाटील यांना काही बोनस मतं मिळु शकतात.तर ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्या गेल्या वेळच्या ६८८७ मतांत किती वाढ करू शकतात, यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. जो उमेदवार मोते सरांना गेल्या वेळी मिळालेल्या मतांपैकी जास्तीत जास्त मतं खेचु शकेल तोच विजयाचा मानकरी ठरेल !

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.