शिवजयंती -2023 वास्तविक खरी शिवजयंती ८ एप्रिलाच साजरी करु,,
*"८ एप्रिल १६२७ छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म तारीख"*

इतिहासात मागे वळून पाहिले तर छ. शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा व त्यांच्या जन्म तारखेचा जेवढा घोळ व जेवढी अवहेलना झाली. तेवढी आजपर्यंत कोणत्याही महापुरुषांची झालेली नाही. हे प्रकर्षाने जाणवते. खरे तर महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावर छ. शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला नसता तर आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नसते. आणि पुण्यातील षडयंत्रकारी मंडळींनी काळूही दिले नसते. महाराजांच्या इतिहासात मनुवाद्यांनी आपल्या मतलबी मोठेपणा साठी हेतुपुरस्सर भयंकर घोळ करून ठेवला आहे. आजही या ना त्या कारणाने तो अश्लाघ्य प्रकार सुरूच आहे. त्यासाठी ते मोठे गोंडस नाव देतात ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. परंतु निबर किंवा कोडगे महाशय हे विसरतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्या बरोबरच लेखनी संहिताही पाळावी लागते. असो. त्यानंतर बहुजन इतिहास तज्ञांनी महाराजांचा खरा इतिहास समोर आणून तो सर्वमान्य होऊनही घोळ किंवा अवहेलना अजूनही सुरूच आहे. हे आम्हा बहुजनांसाठी अतिशय क्लेशदायक आहे.
महात्मा जोतिबा फुले यांनी स्वतः पुस्तके/ग्रंथ लिहिले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात स्वतः कारभार सांभाळला त्यांचा दस्तऐवज उपलब्ध आहे. म्हणून या महापुरुषांच्या इतिहासात मनुवादी ब्राह्मणांना घुसखोरी करता आली नाही. परंतु छ. शिवरायांच्या इतिहासा बद्दल तसे घडले नाही. कारण त्यांच्या समकालीन बहुजन वर्ग शिक्षित नव्हता किंवा त्यावेळी बहुजनांपैकी कोणीही महाराजांच्या बहुमुल्य कार्याची नोंद करून ठेवली नाही. आणि म्हणून महाराजांच्या इतिहासात घुसखोरी करण्यसाठी मनुवादी लोकांना मनसोक्त वाव मिळाला व त्यांचा इतिहास बिघडवून ठेवला. तो आता बहुजन लेखकांनी व इतिहास तज्ञांनी दुरूस्त करून खरा इतिहास समोर आणला.
आज बहुजनसमाज छत्रपती शिवरायांची जयंती दोन वेळा साजरी करतो एक शासनाने तात्पुरती ठरविलेल्या तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारी व दुसरी तिथी प्रमाणे या दोन्ही जयंतीनिमित्त बहुजन समाज आपसात विभागल्या गेल्यावर त्यांचा पैसा, उर्जा, शक्ती, व वेळ खर्च होतो. उलट हे सर्व एकत्रित पणे केले तर जयंती भव्य दिव्य स्वरूपात होवून समाजही एकत्रित येऊ शकतो. हे निदान आमच्या सर्व सामाजिक संघटनांनी लक्षात घेतले पाहिजे.
समाज दुभागवणा-या या लोकांच्या हट्टापायी अशा दोन जयंत्या घडवून आणल्या. व साजऱ्या करण्यात येऊ लागल्या. तिथी प्रमाणे जयंतीची तारीख बदलत राहते. उदाहरणार्थ मागच्या वर्षी तिथी प्रमाणे तारीख होती ३१ मार्च तर या वर्षी तारीख येते २१ मार्च शिवाय शासनाने घोषित केलेली तारीख आहे १९ फेब्रुवारी. महाराजांच्या जयंती विषयी हा किती घोळ व अवहेलना? महाराजांची जयंती एकाच दिवशी व एकाच तारखेला साऱ्या देशभर साजरी व्हायला पाहिजे असे वाटते. महाराजां विषयी साऱ्या बहुजनांची अस्मिता जरी एक असली तरी श्रेय वादापायी मनं दुभंगली जातात हो… बड्या बड्या राजकारण्यांनीही आपल्या राजकीय हट्टापायी राजकीय खेळ खेळला असला तरी समाज मनाचा खेळ खंडोबा करून ठेवला. हे मोठ्या खेदाने म्हणावे लागते.
ॲड. अनंत वि. दारवटकर आपल्या ‘अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज या पुस्तकात लिहितात. “वैशाख शु.
३, अक्षय तृतीया, शके १५४९ रविवार; म्हणजेच ८ एप्रिल १६२७” हिच छ. शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी/जन्म तारीख आहे. परंतु ब्राह्मणी मंडळींनी “फाल्गुन व. ३, शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३०” ही महाराजांची जन्म तारीख निश्चित केली. व सरकारने ही याच जन्म तारखेला त्यावेळी पुर्ण अभ्यास होई पर्यत तात्पुर्ती मान्यता दिली. आणि शिवजयंती १९ फेब्रुवारी ला साजरी होऊ लागली. “अक्षय तृतीयेला शिवाजी महाराजांचा जन्म होईलच कसा? कारण त्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला आहे” असा उपरोधिक टोला वरील पुस्तकाच्या लेखकांनी लगावला. पुढे ते म्हणतात “परशुरामाच्या जन्म दिवशी छ. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस नको म्हणून हा खटाटोप. दुसरे असे की महाराजांची जन्मतिथी फाल्गुनी तिथीस म्हणजे १९ फेब्रुवारी ला नेऊन याच दिवशी रा. स्व. सं. चे एक दिवंगत प्रमुख गोळवलकर व नाना फडणवीसांची जयंती साजरी करायची व प्रचार, प्रसार माध्यमातून दैनिकांमध्ये पानेच्या पाने भरभरून त्यांच्यावर स्तुती सुमनांच्या जाहिराती देऊन हळूहळू शिवाजी महाराजांच्या व पर्यायाने महाराजांच्या राष्ट्रीय प्रगल्भतेच्या कार्यास पडद्यामागे टाकायचे आणि तेही नाही जमले तर महाराजांच्या आवरणाखाली निदान १९ फेब्रुवारी ला येणारी गोळवलकर यांची जयंती साजरी करून घ्यायची व त्या आधारे जनतेचा मेंदू धुवून काढायचा. असे हे षडयंत्र आहे”.
ॲड. अनंत दारवटकर यांनी सतत ३० ते ३५ वर्षे स्वतः व सहकाऱ्यांच्या मदतीने गडकोट, सह्याद्रीच्या कडे कपारीतून फिरून आणि असंख्य इतिहासाचे साहित्य चाळून महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा शोध लावला. छ. शिवाजी महाराजां पासुन ते छ. संभाजी महाराजां पर्यंत १ ते ५ या खंडात आधीच्या ब्राह्मणी इतिहास कारांचे,(?) ऐतिहासिक शकावल्या व बखरींचे पूर्ण खंडन करून पुन्हा नव्या पुराव्यासह नव्याने इतिहास लिहिला. त्याला आजपर्यंत कोणीही आव्हान देवू शकले नाही. हे सर्व बहुजनांनी समजून घेतले पाहिजे. बहुजनांच्या सर्व महापुरुषांचा खरा इतिहास वाचला पाहिजे. वाचन हे ‘शैक्षणिक वरदान’ आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.
वरील ॲड. अनंत दारवटकर यांच्या नव्याने इतिहास संशोधनाने वाटायला लागले की, महाराजांच्या जन्म तारखे विषयी
थांबवलेला आभ्यास सुरू करून नविन समोर आलेल्या पुराव्या नुसार महाराजांची एकच जन्म तारीख ८ एप्रिल साऱ्या देशभर एकच दिवशी साजरी व्हावी.
महाराजांची एकाच तारखेला एकच जयंती साजरी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर बहुजन इतिहास तज्ञ व इतिहास लेखक यांच्या एका समितीचे गठन करावे. परंतु त्या समितीत एकाही ‘घाल मोड्या दादा’चा समावेश करू नये अशी सर्व सामाजिक संघटनांनी अट घालायला पाहिजे. म्हणजे साऱ्या देशभर महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरी होईल यामुळे बहुजनांचा पैसा, वेळ, शक्ती वाचेल. व सारा समाज एकत्रित राहिल.
संदर्भ: ‘अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज’ १ला खंड.
लेखक ॲड. अनंत वि. दारवटकर
_____________________________________