ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट हा लाचेचा प्रकार मानून ती रद्द करावी !

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांची मागणी

महाराष्ट्रातील एका मानद स्वायत्त विद्यापिठाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डी.लीट.ही मोलाची मानद पदवी देणे हा राजकिय भ्रष्टाचाराचाच प्रकार असल्याने डि.वाय.पाटील विद्यापिठाने ती मागे घ्यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी केली आहे.

नवी मुंबई येथील डाॅ. डि.वाय.पाटील या मानद स्वायत्त विद्यापिठाने काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समारंभपूर्वक डी.लीट. ही मानद पदवी प्रदान केली. डि.वाय.पाटील विद्यापिठ हे शासनमान्य मानद विद्यापिठ आहे. एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना त्यांना डी.लीट. ही पदवी देणे, ही कृती राजकिय भ्रष्टाचाराचाच प्रकार असून या पदवीदानाने मुख्यमंत्र्यांना उपकृत करून अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराच केला आहे.

ही मानद पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास न करता व कोणतीही परीक्षा न देता,डी.लीट. ही सन्मानाची पदवी देणे हा डी.लीट. ही डाॅ.ऑफ लिटरेचर / डाॅ. ऑफ लेटर्स पदवी देऊन हा अनुचित पायंडा पाडला आहे.

महाराष्ट्रात असंख्य साहित्यिक,
विचारवंत व सेवाभावी समाजसेवक असताना नेमके मुख्यमंत्रीच डी.लीट. या मानद पदवीसाठी कसे पात्र ठरतात ? हा प्रश्न विचारवंतात चर्चिला जात आहे.

या पदवीदान प्रसंगी कुलपती विजय पाटील यांनी आत्ता आपण डॉ.एकनाथ शिंदे होणार ! असे म्हणताच- बहकलेल्या एकनाथ शिंदे यांनी, मी या आधी छोटी-मोठी ऑपरेशन्स केली आहेत,अशी दर्पोक्ती करून आपले अज्ञान जाहिर केले. डॉ.ऑफ लीट. ही मानद पदवी असल्याने त्यांना आपल्या नावासमोर डाॅ.ही बिरूदावली लावता येणार नाही,तसेच ही डी.लीट ही मानद पदवी साहित्य व लेखनाशी संबंधित असून त्याचा ऑपरेशनशी दूरान्वयेही संबंध नसतो. तर संशोधन न करता व प्रबंध न लिहिता मिळवलेली ही रेडीमेड पदवी आहे,याचे भानही त्यांना राहिले नाही.

*निव्वळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळेच डि.वाय.पाटील या शासनमान्य मानद विद्यापिठाने मुख्यमंत्र्यांना लोणी लावण्यासाठी ही पदवी प्रदान केली आहे. अशा प्रकारे पदव्यांची खिरापत वाटून ही डिम्ड/मानद विद्यापिठं बुद्धिमान व अभ्यासू विचारवंतांचा अपमान करून डी.लीट.या पदवीचे अवमूल्यन करीत आहेत. या अपप्रकारा विरोधात उच्च न्यायालयात दाद मागून हा अनिष्ठ पायंडा हाणून पाडला पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.