
नाशिक-:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे नुकतेच आयोजन करण्यात आले आहे.
याच अंतर्गत मेरी माती मेरा देश’ ‘मिट्टी को नमन विरों को वंदन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जनसेवेचे व्रत हाती घेऊन, आपले कामकाज करत असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या समर्पणाची आठवण करता यावी यासाठी म्हणून, नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे शहीद पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदरांजली व या शूर शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान पोलीस अधीक्षक कार्यालय, आडगांव, नाशिक या ठिकाणी नुकताच आयोजित करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण पोलीस दलात नेमणूकीस असताना व आपले कर्तव्य सेवाभावाने पार पाडत असताना, १) प्रल्हाद अर्जुन पाटील, २) खुशालराव बुधाजी निकुंभ (मराठे), ३) वामन माधव भांगरे, ४) तानाजी मनिराम बच्छाव, ५) परशराम सयाजी गायकवाड, ६) शेख अब्जल इस्माईल, ७) भास्कर भिमाजी सानप, ८) त्रंबक रामचंद्र मुंढे, ९) राजेश पुंडलिक कदम असे एकूण ०९ पोलीस अधिकारी व अंमलदार मृत्युमुखी पडले होते. अशा सर्व पोलीस अंमलदारांच्या कुटुंबीयांचा सन्मान पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण ,श्री. नितीनकुमार गोकावे, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय), नाशिक ग्रामीण उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी शहीद पोलिसांच्या अनेक सदस्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या तर, काही लोक भावनाविवश झाल्याने, आपले मनोगत व्यक्त करू शकले नाहीत.
शहीद पोलिसांच्या गावी होणार कार्यक्रम :
२१ ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो. यावर्षी सदर स्मृतिदिन १८ ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी ज्या ज्या गावातील पोलीस अधिकारी अथवा अंमलदार शहीद झाले आहेत, त्यांच्या राहते गावीदेखील सदरचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शहिदांच्या कार्याचे स्मरण व्हावे व इतरांना त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा मिळावी, हा सदर कार्यक्रम राबविण्यामागील उद्देश आहे. कार्यक्रमांना संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित राहतील, अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.