अंबरनाथ येथे लाॅर्ड बुध्दा ग्रुपच्या विद्यमाने कॅंडलमार्च आणि महाबुध्द वंदनेने महामानवास अभिवादन

एक है तो सेफ है. हे अर्धसत्य आहे . एक असणाऱ्या समाजामध्ये, एक असणाऱ्या माणसांमध्ये नेक विचार नसेल तर ते सेफ राहू शकत नाहीत. ” असे प्रतिपादन सांस्कृतिक प्रदुषण मुक्ती अभियानाचे अभियान प्रमुख सुरेंद्र खरात यांनी केले. सर्वोदय नगर , अंबरनाथ येथे लाॅर्ड बुध्दा ग्रुपच्या विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ५ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री संपन्न अभिवादन सभेत सुरेंद्र खरात आपल्या अभिवादनपर भाषणात म्हणाले ” डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील संपूर्ण मानव समाजासाठी दीपस्तंभ आहेत. हा दीपस्तंभ आम्हाला इथल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळी करीता मार्गदर्शक आहे. आज देशाची राजकीय परिस्थिती अशी आहे, की या देशामध्ये लोकशाही राहतेय कि जातेय अशा एका संभ्रमात चिंतेत अखंड देश आहे. देश सन्मार्गाने चालविण्यासाठी सत्ताधारी पक्षा इतकाच विरोधी पक्ष सुध्दा महत्वाचा आहे. यावर उपाय म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हि संकल्पना मांडली. तसेच या देशातल्या मातीतील तत्वज्ञान १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पुनरुज्जीवित केले. हे तत्वज्ञान या देशातील माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी, सम्यक दृष्टी देण्यासाठी समाजकारण आणि राजकारणाला सुध्दा पुरक आहे. या देशातील समाज एक असला तरी तो सेफ नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हा नेक विचार या देशातील मानसा मानसा पर्यंत पोहचवून त्याला सुरक्षित करण्याची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचीच आहे.
महाबुध्द वंदनेने महामानवास अभिवादन अशी अभिनव मानवंदना सालाबादप्रमाणे लाॅर्ड बुध्दा ग्रुपच्या विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त देण्यात आली. त्यापुर्वी भिमराव साळवे गुरुजी , बौध्दाचार्य वानखेडे गुरुजी,वाकुर्डे साहेब यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून अभिवादन रॅली तथा कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते . रात्री १२ वाजता भिमराव साळवे गुरुजी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पन करुन तसेच सुनीताताई जाधव, उषाताई सरवदे, सुशिलाताई जाधव यांच्या हस्ते मेणबत्ती, अगरबत्ती प्रदिप्त करून महाबुध्द वंदना घेण्यात आली. महाबुध्द वंदनेचे विधी संचलन भिमराव साळवे गुरुजी, सुरेंद्र खरात , प्रज्ञाताई सुरेंद्र खरात, सुप्रजादिदि सुरेंद्र खरात यांनी केले. कॅंडल मार्च आणि महाबुध्द वंदने नंतर संपन्न झालेल्या अभिवादन सभेस सांस्कृतिक प्रदुषण मुक्ती अभियानाचे अभियान प्रमुख सुरेंद्र खरात, लाॅर्ड बुध्दा ग्रुपचे संस्थापक महेश जाधव साहेब, भिमराव जाधव गुरुजी, अरुण कदम यांनी संबोधित केले.सर्वोदय नगर आणि चिखळोली परिसरातील जनतेच्या प्रचंड उपस्थितीत धम्म पालन गाथा घेऊन अभिवादन सभेची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश जाधव यांच्या मार्गदर्शनात आनंद पवार, अरुण कदम, ओमकार सवने , प्रतिक कदम, दुलारचंद यांनी प्रचंड परिश्रम घेतले.