राजकीय

बलात्का-यांची शिक्षा माफ होते आणि संजय राऊत यांना जामिन का मिळू शकत नाही ?

संजय राऊत हे खरे तर वादग्रस्त
व्यक्तीमत्व. सडेतोड बोलणे व लिहिणे ही दुधारी तलवार परजत हितशत्रू पासून शिवसेनेचे संरक्षण करणारे लढाऊ बाण्याचे पत्रकार व नेते. ते शरद पवारांशी असलेल्या जवळीकीबद्दल वादात सापडले होते.परंतू भाजपाने सत्तेतील 50-50 वाटा नाकारताच भाजपाची धोबीपछाड करून महा विकास आघाडीच्या स्थापनेतील त्यांचे महत्वपूर्ण योगदान कोणीही नाकारू शकत नाही. महा विकास आघाडीचे सरकार टिकवून ठेवण्यात देखील त्यांचा सहभाग होता.

जेंव्हा एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी मुग गिळून बसत होते तेव्हा विरोधकांना अंगावर घेत बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे ते शिवसेनेची खिंड लढवित होते.एकनाथ शिंदे व त्यांच्या सहका-यांनी शिवसेनेशी गद्दारी केली तेंव्हा रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन ते गद्दारांचा यथेच्छ समाचार घेत होते.त्यामुळे संजय राऊत हे भाजपाच्या रडारवर होते.त्यांनी वेळोवेळी ईडीच्या चौकशीचा सामना ही केला व मी निर्दोष असल्याचा दावा केला. परंतू केंद्रशासनाच्या इशा-यावर चालणा-या इडीने डाव साधला आणि राज्य सभेच्या एका खासदारास नाट्यमयरीत्या अटक केली.त्याचवेळी भाजपात गेलेल्या वा बंडखोरी करून शिवसेनेतून फुटलेल्यांची मात्र इडीने साधी चौकशी ही केली नाही.इडीच्या रडारवरील एकनाथ शिंदे,यामिनी जाधव व त्यांचे पती, भावना गवळी, प्रतापी सरनाईक व त्यांचे कुटुंबिय यांच्या केसालाही धक्का लावला नाही.यालाच भाजपा व इडीची पारदर्शकता म्हणायचे का ? भाजपाच्या वॉशिंग मशीनमधे गेला की तो क्लिन होतो,हेच आजवर दिसून आले आहे. हा शासकिय यंत्रणांचा गैरवापर, सत्तेचा दुरूपयोग व लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. आजवरच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्योतर काळाला इतका अतिरेक कोणत्याही राजवटीत झाला नाही. इंदिरा गांधीजींच्या आणिबाणीलाही लाजवणारी ही हिटलरशाही आहे.

संजय राऊत हे दोषी आहेत की निर्दोष आहेत हे न्यायालयात ठरेल,ते दोषी ठरले तर शिक्षा ही होईल परंतू आज त्यांना 31 जुलै पासून कोंडून ठेवले आहे व त्यांची न्यायालयीन कोठडी वाढत वाढत 19 सप्टेबर पर्यंत नेली.एक संशयित आरोपी निव्वळ चौकशी च्या कारणास्तव जर दीड महिना जेरबंद केला जात असेल तर तो देखील अन्यायाचा अतिरेकच म्हणावा लागेल. संजय राऊत हे एका राजकीय पक्षाचे नेतेच नव्हे तर दैनिकाचे संपादक व राज्यसभेचे खासदार आहेत.त्यांना जामिन देऊन वेळोवेळी बोलावून चौकशी करता येणे सहज शक्य असताना अधिक चौकशी च्या नावाखाली इडीचे अधिकारी न्यायालयीन कोठडी मागत आहे व न्यायालय ती 14-14 दिवसांनी वाढवत आहे.या मागे राजकीय सूडभावना आहे हे न्यायालयाच्या लक्षात येत नसेल का ?
संजय राऊत यांचे निष्णात वकिल ही बाजू माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात का यशस्वी होत नाहीत ?

आपल्या न्यायदान पद्धतीत म्हटले जाते की,99 अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोष व्यक्तिला शिक्षा होता कामा नये.इथे तर दोषसिद्धी होण्याआधीच कारावास भोगावा लागत आहे. उद्या जर संजय राऊत निर्दोष असल्याचे सिद्ध झाले तर हा कारावास ही निरापराध्यास झालेली शिक्षाच सिद्ध होईल. त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य विनाकारण हिरावून घेतल्याचे खापर न्यायदेवतेवर फोडले जाईल,त्याची भरपाई कोण व कशी करणार ? जर संजय राऊत दोषी ठरलेच तर त्यांना कायद्याने जी शिक्षा असेल ती न्यायदेवता देईलच पण निर्दोष ठरले तर काय ?

गुजतातमध्ये बलात्का-यांची शिक्षा माफ केली जाते,उल्हासनगर चा डॉन पप्पू कलानीची आजन्म जन्मठेपेची शिक्षा रद्द करून सुटका केली जाते,तिथे दोष सिद्धी झालेली नसताना संजय राऊत यांना जामीन न मिळणे,ही बाब न्यायोचित वाटत नाही.

दिलीप मालवणकर,
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.