इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला अर्थीक निकषावर आरक्षण देण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
पालघर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन लवकर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणारं

*दलित आदिवासी ओबीसी मराठा सर्व समाजाला सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष मजबूत करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आवाहन*
बोईसर दि. 4 – अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजातील गरिबांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ही मागणी करुन रिपब्लिकन पक्षाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. बोईसर येथील टिमा हॉल येथे पालघर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यात प्रमुख मार्गदर्शन करताना ना.रामदास आठवले बोलत होते.
यावेळी विचारमंचावर कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील; रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; रिपाइंचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य आणि पालघरचे निरीक्षक सुरेश बारशिंग; ठाणे प्रदेश अध्यक्ष बाळाराम गायकवाड; प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे; पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव; युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष सचिन लोखंडे सरपंच लक्ष्मीबाई चांदणे; नरेंद्र करंकाळे; रोहिणी गायकवाड; आशाताई दहाट; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
मच्छिमार समाजाचा कोळी बांधवांचा मासेमारीचा परंपरागत व्यवसाय अडचणीत येणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी. एखादा चांगला प्रकल्प राज्यात येत असेल तर दोन्ही बाजूंनी विचार करून मार्ग काढला पाहिजे अशी वाढवण बंदर बाबत ना.रामदास आठवले यांनी भूमिका मांडली.पालघर मध्ये उद्योग प्रकल्प येत आहेत. त्यात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्यावे. पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जव्हार मोखाडा येथे अद्याप अनेक प्रश्न आहेत. रस्त्यांचा उद्योगाचा शेतमालाला चांगला भाव देण्याचा प्रश्न आहे.या प्रश्नांवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काम करून आदिवासी बांधवांना सोबत घ्यावे. दलित ;आदिवासी ;ओबीसी मराठा; मुस्लिम ; लिंगायत ; ख्रिश्चन सर्व जाती
धर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष मजबूत करा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
पालघर नवीन जिल्हा निर्माण झाला आहे.मात्र अद्याप येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण झाले नाही. त्यासाठी जमीन देण्याची शासनाने घोषणा केली आहे.मात्र अद्याप डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण झाले नाही. जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे यामागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले. पालघर मध्ये सुपर स्पेशॅलीटी हॉस्पिटल उभारले पाहिजे या मागणीसह विविध प्रश्न सोडविण्याकडे आपण लक्ष देऊ असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडे देशाच्या विकासाचा मुद्दा नाही. ते केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आले आहेत. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी येत्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदीच पुन्हा प्रधानमंत्री होतील असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
चांद्रयान 2 मोहीम अपयशी ठरल्या नंतर प्राधानमंत्री मोदींनी आपल्या संशोधकांना हिम्मत आणि प्रोत्साहन देऊन चांद्रयान 3 साठी अधिक निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता जी चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली आणि जगात भारताचा अधिक मान वाढला त्यात आपल्या संशोधकांचे योगदान मोठे असुन त्या यशामागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचेही मोठे योगदान आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
देशात 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचे काम करताना आज पर्यन्त 4 कोटी लोकांना प्रधानमंत्री मोदींनी घर दिले आहे. 9 कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत गॅस सिलेंडर दिले आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिली.