सर्वोच्च ‘ गणेश दर्शन! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेणे हे परंपरेशी विसंगत आहे _दिवाकर शेजवळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या गणेशोत्सवात
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जावून
‘ गणेश दर्शन ‘ केले आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे. तसेच आजवर प्रचलित असलेले संकेत आणि परंपरेशी ते विसंगत आहे, हे कोणीही अमान्य करू शकत नाही. इथे गणरायाचे दर्शन हा वादाचा मुद्दा होवूच शकत नाही. श्रद्धा आणि उपासनेचा मौलिक अधिकार सर्व धर्मियांना संविधानाने दिलेला आहे. मुद्दा आहे तो फक्त आणि फक्त पंतप्रधानांनी
सरन्यायाधीशांच्या घरी जाण्याचा.
गणेश दर्शनासाठी पंतप्रधानांना आपल्या घरी सरन्यायाधीशांनी निमंत्रित केले होते काय?
की,
पंतप्रधान स्वतःहून वाट वाकडी करून चंद्रचूड यांच्या घरी गेले?
या प्रश्नांचे उत्तर मिळाले पाहिजे. लोकशाहीतील संकेत, परंपरा मोडीत काढून घटनात्मक संस्थांचे स्वतंत्र अस्तित्व विरघळवून टाकण्याचा हा कारनामा कुणाचा यावर त्यातून प्रकाश पडू शकेल. कारण मोदी यांनी सर न्यायाधीशांच्या घरी पायधूळ झाडल्यामुळे चंद्रचूड यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे, एवढे मात्र नक्की.
संसद, न्यायपालिका, प्रशासन आणि मीडिया हे लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत. त्यातील प्रत्येकाचे अस्तित्व स्वतंत्र आणि कार्यकक्षा भिन्न आहेत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहावे, हेच संविधानाला अभिप्रेत आहे. देशाच्या राष्ट्रपतींना सरन्यायाधीश शपथ देतात. त्यातून न्यायसंस्थेचे श्रेष्ठत्वच अधोरेखित आणि प्रस्थापित होत असते. चारपैकी एकाही आधारस्तंभाचे स्वतंत्र अस्तित्व लोप पावणे म्हणजे लोकशाहीवरच गंडांतर म्हणावे लागेल