साक्षीच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आडम मास्तर यांचा आंदोलनाचा इशारा
सोलापूर प्रतिनिधी

शहरात अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, बेजबाबदार अनियंत्रित माल वाहतुकीमुळे सहावर्षीय साक्षी कलबुर्गीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तसेच शहरा अंतर्गत जडवाहतूक पूर्णपणे बंद न झाल्यास अनियंत्रित जडवाहतूक व मालवाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला.
सोमवारी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम
यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम राजकुमार यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव अॅड एम. एच शेख, नसीमा शेख, शेवंता देशमुख सुनंदा बल्ला, अॅड अनिल वासम विल्यम ससाणे आदींचा समावेश होता.
मृत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा त्याची सखोल चौकशी व तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाकडे मयताच्या कुटुंबीयास २५ लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.