आपला जिल्हा

औरंगाबाद प्रमाणे अहमदनगर शहराच नाव बदलण्याची मागणी म्हणजे दुर्दैवच_भुषण देशमुख

औरंगाबाद प्रमाणेच अहमदनगर शहराचं नाव बदलण्याची मागणी काहींनी केली आहे. आपण जिथं राहतो, मोठे झालो, त्या शहराच्या संस्थापकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं तर दूरच राहिलं, पण त्यानं मोठ्या कष्टानं वसवलेल्या शहराचं नाव बदला, अशी मागणी काही महाभागांनी केली आहे. खरंतर अहमदनगर शहर ज्यांनी वसवलं, त्या राजानं नव्हे, तर इतरांनी हे नाव ठेवावं, असं सूचवलं. स्वत: राजानं आपल्या नावाचा साधा शिलालेख कुठंही लावलेला नाही. जगातील महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये ज्याचा समावेश होते, त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर, बुरूजांवर किमान आपल्या महालावर नाव कोरून घेणं राजाला अवघड नव्हतं, पण त्यानं ते केलं नाही. मलिक अहमद निजामशाह यांच्या ताब्यात तेव्हा बहुतांश महाराष्ट्र होता. शिवनेरी, दौलताबादसारखे अनेक किल्ले होते, पण त्यांनी हे शहर आपलं मानलं. राज्यकारभाराची सूत्रं इथल्या भुईकोटातूनच हलवली. चिरविश्रांतीसाठी त्यांनी सीना नदीकाठीच बाग तयार करून आपल्या कबरेची जागाही निश्चित करून ठेवली होती. आपण गेल्यानंतर निदान पुढच्या पिढ्यांना आपलं नाव कळावं, म्हणून कबरीवर नाव खोदून ठेवायलाही त्यांनी आपल्या कुठल्या मंत्र्याला, सरदाराला (किंवा खासदाराला) सांगितलं नाही. त्यांनी नाही लिहून ठेवलं, तरी जगभरातील इतिहासकारांनी निजामशहाचा गौरवानं उल्लेख केला आहे.

अवघ्या दोन-चार वर्षांत जगातील सुंदर म्हणून अोळखल्या जाणाऱ्या कैरो आणि बगदादच्या तोडीचं अहमदगर शहर बनवणाऱ्या राजाच्या कर्तृत्वाविषयी ज्यांना माहिती नाही, ते या शहराचं नाव बदला असं म्हणतात, यासारखा कपाळकरंटेपणा दुसरा नाही. हा राजा काही बाहेरच्या कुठल्या देशातून आलेला नव्हता. तो महाराष्ट्राच्या मराठी मातीतलाच होता, हेही राजकारणात घोडे नाचवणाऱ्यांना माहिती नसावं. ‘अहमदनगर’ या नावातच मुस्लिम आणि हिंदू संस्कृतीचा मिलाफ झाला आहे. राजाच्या दरबारातही सर्व जाती-धर्मांच्या, सर्व प्रांतांच्या आणि देशांच्या लोकांचा गौरव होत असे. अट एकच त्याच्या अंगी कर्तृृत्व असलं पाहिजे. डोंगरावर पडणारं पावसाचं पाणी अडवून खापरी नळानं २४ तास आपल्या रयतेला पुरवणारा, उद्यान, कारंजी आणि खापरी नळ तयार करणारा, जलमहाल बांधणारा, विणकरांना उत्तेजन देऊन हातमागाचा व्यवसाय इथे सुरू करणारा, गनिमी काव्याने युद्ध जिंकण्या बरोबरच लढण्यात मागे राहणाऱ्यांचं आत्मबल वाढवण्यासाठी युक्त्या योजणारा, सौंदर्यदृष्टी जपण्या बरोबर विद्या व्यासंग वाढवणारा संस्थापक या शहराला लाभला, याचा आनंद आणि अभिमान इथं राहणाऱ्या प्रत्येकाला वाटला पाहिजे. वर्षातला एक दिवस या शहरासाठी राखून ठेवून त्याचं मोठेपण समजावून घ्या, म्हणजे आपण इथले रहिवासी आहोत हे किती भाग्याचं आहे हे समजेल…

भूषण देशमुख, ९८८१३३७७७५

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.