जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या धारदार लेखणीने दिग्गजही थरथरतात- डॉ.शिवरत्न शेटे

उल्हासनगरचे जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर हे धमक्यांनी थरथरणारे पत्रकार नसून आपल्या धारदार लेखणीने अनेक दिग्गजांना थरथरायला लावतात,असे पत्रकार दुर्मिळ आहेत,म्हणून त्यांच्या निर्भीड लेखणीस सलाम करण्यासाठी मी आलो आहे,असे उद्गार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी काढले.
उल्हासनगरचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या “उल्हास दर्पण” या संदर्भ ग्रंथाच्या टाऊन हॉल येथील प्रकाशन समारंभात डॉ.शेटे बोलत होते.
पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या वाढ दिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात.या वर्षी दिलीप मालवणकर यांच्या “उल्हास दर्पण” या उल्हासनगरच्या 1942 पासून आजपर्यंत च्या सामाजिक,राजकिय वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे.यात तपशिलवार माहिती व लेखांचा समावेश असून महापालिकेच्या वाटचाली बरोबर फसव्या अर्थसंकल्पाच्या गेल्या 25 वर्षाचा वस्तुनिष्ठ आरसा समाजासमोर ठेवला आहे.
एक माहितीपूर्ण व दुर्मिळ माहितीचा संग्राह्य संदर्भ ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे सदस्य व ज्येष्ठ सनदी अधिकारी आर.डी.शिंदे यांनी मालवणकर यांना धन्यवाद दिले. त्यांच्याच हस्ते या संदर्भ ग्रंथाचे प्रचंड उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, प्रख्यात पार्श्वगायिका पुष्पाताई पागधरे, ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस,सुप्रसिद्ध अभिनेते निलेश शेवडे, स्प्राऊट्स या इंग्रजी दैनिकाचे धडाकेबाज संपादक उन्मेष गुजराथी हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी व सुसंवादक अरूण म्हात्रे यांनी ओघवत्या शब्दात केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले प्रख्यात शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी आपल्या भारदस्त व्याख्यानाचे श्रोत्यांना शिवकालात नेऊन मंत्रमुग्ध केले.शिवशाही व विद्यमान परिस्थितीची सांगड घालत त्यांनी डोळ्यात अंजन टाकणारे व्याख्यान देऊन श्रेत्यांची प्रचंड दाद मिळवली.या वेळी दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांचा तसेच स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा ह्रद सत्कार करून त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकिय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.