ताज्या घडामोडी

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांचा तुफान प्रतिसाद!

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या अखत्यारीत १६ प्राथमिक व ४ माध्यमिक शाळा असून या शाळांमध्ये सन २०२४-२५ या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कुळगांव बदलापूर नगरपरिषद प्रशासनाने मागील काही वर्षापासून शाळांच्या भौतिक सुविधांसोबतच शाळांच्या गुणवत्तेसाठी देखील प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळेच सन २०२४ या वर्षी इ.१० वीच्या शालांत परीक्षेत कुळगांव, कुळगांव उर्दू, एरंजाड व बेलवली या चारही माध्यमिक शाळांचा चांगला निकाल लागून विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. या यशामुळे आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षक घेत असलेल्या मेहनतीमुळे दुर्बल, वंचित तळागाळातील घटकांचा तसेच मध्यमवर्गीयांचा ओढा मोफत शिक्षणासोबतच मोफत शैक्षणिक सुविधा देणाऱ्या नपाच्या शाळांकडे वाढल्याचे दिसून येत आहे व या शाळांमध्ये हिंदी भाषिक विद्यार्थी देखील मराठी मध्ये शिक्षण घेत आहेत.


नगरपरिषद शाळांच्या आकर्षक इमारती, अद्ययावत सोयीसुविधा तसेच सेमी इंग्रजी माध्यमातून दिले जात असलेले शिक्षण व विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन व शिबिरांद्वारे स्पर्धा परीक्षांची तयारी यामुळे पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नपा शाळांकडे वळत आहेत. खाजगी शाळांची वाढती फी व लादले जाणारे इतर छुपे खर्च यामुळे पालकांनी न. पा च्या मराठी शाळांना पसंती दिली आहे. शासनामार्फत नगरपरिषदेच्या कुळगांव मराठी व कुळगांव उर्दू या दोन शाळा पीएम श्री तसेच एरंजाड या शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये जिल्हास्तरावर झालेली निवड आणि गेल्या वर्षी ज्युवेली या इ. १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळेने गाठलेली ५०० ची पटसंख्या या सर्व बाबींमुळे पालकांचा नगरपरिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून पालक आपल्या पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी कु. ब. न. प शाळांना पसंती देत आहेत.शाळांच्या या दर्जेदार कामगिरीमागे मुख्याधिकारी श्री.योगेश गोडसे यांचा मोलाचा सहभाग व मार्गदर्शन आहे. तसेच नपा शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी तसेच दोन्ही केंद्रसमन्वयकांनी दिलेली साथ व प्रतिसाद यामुळे नपा शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.


न पा शाळांच्या वाढीसाठी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना,पालक,मीडिया, न पा सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य सातत्याने मिळत आहे.
दि. १५ जून २०२४ शाळा प्रवेशोत्सव व पटनोंदणीच्या या पहिल्या दिवशीच तब्बल ३३९ विद्यार्थ्यांनी नपा शाळांमध्ये प्रवेश घेतलेला आहे. नपा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार
दिनांक १५ जून २०२४ रोजी कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळामध्ये पुढील प्रमाणे नवीन विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत.

शाळेचे नाव. विद्यार्थी संख्या

कुळगांव मराठी. ८५
कुळगांव उर्दू. १०
जोवेली ५०
मानकिवली २
शिरगांव वाजपे. ५
शिरगांव आपटेवाडी २
कात्रप ६
मोहपाडा ५
हेंद्रेपाडा १४
बदलापूर उर्दू १०
सोनिवली १५
वालिवली ६
एरंजाड ९८
बेलवली २८
वडवली ७
मांजर्ली ३
—————————————-
एकूण ३४६

विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी नपा शाळांमध्ये प्रवेश घेतलेला आहे.
प्रशासनाने वाढत्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतल्याचे सर्व श्रेय नपा शाळांतील शिक्षकांचे असल्याचे म्हटले आहे.


शहरातील पालकांनी मोठ्या संख्येने आपल्या पाल्यांचा प्रवेश कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी व मराठी माध्यमातून घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री. योगेश गोडसे यांनी पालकांना केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.